कवयित्री यामिनी दळवी हिचा काजळकाठ हा पहिलाच कवितासंग्रह. यामिनी ही आजच्या तंत्रयुगातली, ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारी, आधुनिक विचारांची आणि तरुणाईचे नेतृत्व करणारी बुद्धिमान युवती. जिच्या रक्तात कविता अशीकाही मिसळली आहे की जनुकांची तपासणी केली तर फक्त गझल आणि कविताच सापडतील… सशक्त काव्याबीज असल्याशिवाय कविता उगवत नाही हेच खरे..यामिनीची कविता त्याच जातकुळीची आहे. तिची कविता क्षणाक्षणाला भावविभोर करते.
“किती रात्रीसोबत विरघळून जातो आपण
किनारा सोडून बुडत जातो खोल खोल
मग भरकटलेल्या गलबतासारखी दिशाही नाही सापडत
कोणता दीपस्तंभही नकोच असतो म्हणा ..
आपण पांघरलेलं असतं नक्षत्रांचे आभाळ
त्यानंतर मग पापण्यांवर जमा झालेलं धुकं
डोळ्यांचे ओले ’काजळकाठ ’..”
किती सुंदर आहे ना हा काजळकाठ!
या संग्रहातील कवितेच्या डहाळीवर स्वप्रत्ययाची असोशी लगडून आलेली जाणवत राहते.स्वजाणीव तर आहेच पण सामाजिक अंगाने आलेल्या कविता बेचैन करतात.
“उद्याच्या आयुष्याच्या विचार करताना
लागते डोळ्यांना धार
आणि जिभेला भरतं कापरं..
दोनाचे चार हात झाल्यावर
चार पोटासाठी भरडून घ्यावच लागणार आहे स्वतःला
पण निष्पाप डोळ्यांना
मिळावी शांततेची झोप म्हणून
तुला मात्र ‘जागं ‘राहावं लागेल!!!”
सर्वाभूती विचार करणारी ही कवयित्री मानवतेचा जागर करण्यासाठी सदैव तयार आहे. तिचं नातं मानवतेशी आहे.
आजचा भवताल तिला अस्वस्थ करतो. म्हणूनच तिच्या कवितेच्या ओळी अंतर्मुख करतात. ती म्हणते..
“प्रत्येकाला ओरबाडायचे आहे
इथल्या देत जाणाऱ्याला!”
काय सांगू पाहते ही कविता?
अनेकदा कमी वयात लिहिली जाणारी कविता फुलपाखराचे रंग लेऊन बागडताना दिसते. परंतु यामिनी दळवी हिची कविता धीरगंभीर आहे. तिच्या जाणिवांचा काठ वाचकाला समजुतीच्या मार्गानं घेऊन जातो.
“रुक्मिणीच्या मांडीवर डोकं ठेवून
कृष्णाला झोप लागली
आणि स्वप्नात आली राधा ..”
आहाहा! काय सुंदर ही कल्पना!!
संयत प्रेमाची एक वेगळीच भाषा ही कविता बोलते..
मनोज बोरगावकर यांची अतिशय सुंदर प्रस्तावना या संग्रहास लाभली आहे.मनोज म्हणतो तसे कवितेत केवळ शब्दांचाच दरवळ असून चालत नाही. काळजातले जोपर्यंत उगवले, शिवले जात नाही तो पर्यंत कवितेचे काठ आणि पदर उजागर होत नाहीत. एकेक शब्द काळजातला बोलणारी ही कविता हातातातून सुटत नाही.
दुःख, वेदना, घालमेल, आणि आकांत मांडणारी ही कविता अनेक पदरी अर्थात बहुपेडी आहे. मुक्त छंदात पदन्यास करीत ती आकाशीच्या चंद्रकोरीसम शीतल, मंद पावलांनी वाचकाच्या मनात चांदणे भरते. पहिला संग्रह असला तरी ही कविता नवखी वाटत नाही.
संपूर्ण कवितासंग्रहाचे तीन वेगवेगळे पापुद्रे यात पहावयास मिळतात.
काजळकाठ, समजुतीच्या मार्गाने, आणि जळत्या काळाची साक्षीदार!
“माझ्या कित्येक व्याकूळ रात्रींना
तू शुभंकराची ओंजळ दिलीस
आणि कित्येक अपयशी क्षणी
मी माझा पान्हा तुझ्या ओठी दिला…”
अशी धाडसी बोली बोलणारी ही कविता खूप प्रश्न निर्माण करते. देहाशी तिचा संबंध जोडला जाऊ शकतो.. पण ती एक रूपक पांघरते..
हे ज्याला समजेल त्याला ही कविता खूप नितळ जाणवेल.
जेव्हा ती उदास असते तेव्हा कुणीतरी तिला ओंजळभर फुलं दिली आहेत. आणि तिनेही ममत्व भाव ठेऊन त्या कुणाची मनोमन मदत केली आहे. शुभंकराची ओंजळ या कवितेसह
संग्रहात अनेक कविता बंड करणाऱ्या आहेत.
अबाउट टू डाय, विरामचिन्ह, जुनी तहान, शहर होता आलं नाही ,अपूर्ण कवितांचे देणं आदी..
जळत्या काळाची साक्षीदार, या भागात अस्वस्थ काळाच्या नोंदी आहेत. आणि त्या रक्ताच्या शपथेवर खऱ्या उतरल्या आहेत.
ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाचे देखणे मुखपृष्ठ आणि आतील रेखाटणे केली आहेत ती विशाल गोळे यांनी. मनोज बोरगावकर यांची प्रस्तावना आहे आणि मलपृष्ठावर कवयित्रीने अंथरलेल्या भावशब्दांच्या ओळी..
संग्रहात एक राधा भेटते.. मीरा भेटते..
एखादा झगडणारा माणूस भेटतो.. दुःखी झाड भेटून जातं.
आणि भेटतात आत्ममग्न काळीजकोपरे!
आशा पैठणे, लेखिका- कवयित्री
नांदेड