मी यामिनीचं अतिशय मनापासून अभिनंदन करते, तिच्या पुढच्या सगळ्या प्रज्वल अशा वाटचालीला शुभेच्छा देते. आणि ग्रंथालीसारख्या एका अतिशय मातब्बर अशा प्रकाशन संस्थेने हा कवितासंग्रह काढणं, त्याचं प्रकाशन करणं, किंवा त्या सगळ्या निर्मिती प्रक्रियेमध्ये इनिशिएटिव्ह घेणं ही सुद्धा गोष्ट फार मोलाची आहे. जवळपास ४०-५० वर्षाचा माझा स्वतःचा वाङ्मयीन सगळा प्रवास आहे, माझ्यामागे एक मोठी एक लिगेसी आहे, वारसा आहे. आणि मला हे आवर्जून सांगायचं आहे की, मराठीतला जो मधला सगळा वाङ्मयीन काळ आहे, त्या काळाचा चेहरामोहरा बदलण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे, ती ग्रंथालीसारखी प्रकाशन संस्था आहे.
.
आत्ताच सुदेश हिंगलासपूरकरजींनी कविता दशकाची याचा उल्लेख केलेलाच होता, पण सुदेशजी मला आठवतं की ग्रंथालीची यात्रा पण निघाली होती, आणि यामिनी आता ज्या वयामध्ये आहे, त्याच्यापेक्षाही कमी वयामध्ये मी महाराष्ट्रभर ते फिरले होते. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रंथालीने यामध्ये पुढाकार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे.
.
यामिनीने जेव्हा मला स्क्रिप्ट पाठवलं तेव्हा ती मला म्हणाली की शेवटचा जो सेक्शन आहे ना, तो शेवटचा सेक्शन तुम्हाला खूप आवडेल याची मला खात्री आहे. मला असं म्हणावंसं वाटतं यामिनी, शेवटचाच काय, तुझा अगदी पहिला, म्हणजे ‘काजळकाठ’, नंतर ‘समजुतीच्या मार्गानं’ आणि नंतरचा ‘जळत्या काळाची साक्षीदार’, हे तिन्ही भाग हे जरी त्याचं एक स्वरूप म्हणून ते वेगवेगळे असले तरी त्याच्यामध्ये एक निश्चित आंतरिक असं सूत्र आहे. आणि जसं मगाशी लतिकाताई म्हणाल्या की स्व पासून सुरू होऊन व्यक्तिपासून समष्टीपर्यंत जाणं असा सगळा प्रवास आहे.
.
खरंतर मला हा सगळा संग्रह वाचताना आणि मगाचा कार्यक्रम पण ऐकताना असं वाटलं की, तिने स्वतःवर कोणतीही कुंपणं लादलेली नाहीयेत. तिच्या कवितेमध्ये ज्या प्रेम भावना आहेत, त्या प्रेम भावनेमध्ये एक प्रकारचा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, एक सेन्शुअसनेस आहे, इंद्रियजन्यता आहे… आणि हा जो एक मोकळेपणा आहे, तो फार महत्त्वाचा आहे. हे सगळं घेऊन मग पुन्हा नात्यामध्ये आलेला अंतराय, त्याचा सगळा समजुतीने केलेला स्वीकार या सगळ्या मार्गाने ती पुढे जाते. आणि मग ‘जळत्या काळाची साक्षीदार’ असा एक विभाग आहे… असं म्हणूया की तिची कविता ही एका धारदार संगिनीमध्ये कशा प्रकारे रूपांतरित होऊ शकते, याचं जर आपल्याला प्रत्यंतर घ्यायचं असेल, बघायचं असेल, तर तिच्या या सगळ्याच कविता वाचाव्यात. आपण अतिशय अंतर्मुख होतोच त्या सगळ्या कविता वाचताना.
.
मला एक सांगावंसं वाटतं की कुठलाही साहित्य प्रकार असूदेत, कुठलाही जॉनर असूदेत, ते नाटक असेल, कथा कादंबरी असेल, कविता असेल… पण लिहिणाऱ्या व्यक्तीला आपला काळ जर समजून घेता आला नीटपणे, अंतर्बाह्य पद्धतीने, तर मग कवितेमध्ये ताकद असतेच असते. अलीकडेच एका कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ झाला आणि त्या प्रकाशन समारंभामध्ये बोलताना मी असं म्हणाले की, ज्या पद्धतीने आपल्याला जगण्यासाठी फ्रिज, टूथब्रश, तवा, पोळपाट-लाटणं, सोफा या सगळ्या गोष्टी जितक्या अनिवार्य असतात आपल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये… तर कविता तितकी अनिवार्य बनायला पाहिजे.
.
कवितासंग्रहाच्या आपण जास्तीत जास्त प्रती विकत घेतल्या पाहिजेत. जोपर्यंत कविता नावाची गोष्ट, साहित्य नावाची गोष्ट, ज्या जळत्या काळाचे साक्षीदार आपण सगळेच जण आहोत, आणि कधी नव्हे इतकी सर्व ललित कलांची, साहित्य नावाची कलेची जबाबदारी कैक पटीने वाढलेली आहे… मला असं वाटतं की हे सगळं खूप महत्त्वाचं आहे.
.
यामिनीची एक कुठलीतरी प्रतिमा आहे एका कवितेमध्ये, ‘अजेंड्याची दुकानदारी’ असं काहीतरी. आणि तिची जी उलाघाल आहे ना त्या सगळ्या याच्यामध्ये वावरत असताना, जगत असताना, या सगळ्या काळाला भिडत असताना… काय घालमेल होऊ शकते एका अतिशय सच्चेपणाने काही व्यक्त करू पाहणाऱ्या व्यक्तीची! मला यामिनीने खरंतर एक सुखद असा धक्का दिलेला आहे. मला वाटलं नव्हतं, जेव्हा माझ्या हातामध्ये हा कवितासंग्रह आला, कारण मी तिला एका कोरम मॉलमध्ये ऐकलं होतं. कोरम मॉलमध्ये कवी संमेलन झालं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ठाण्यामधल्या कोरम मॉलमध्ये मला वाटतं लोकमतने एक कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये चक्क त्या मॉलच्या दर्शनी भागामध्ये ग्रंथ प्रदर्शन भरवलं गेलं होतं आणि सगळ्या युवा कवींच्या कवितांचं तिथे सादरीकरण झालं होतं ज्याची मी अध्यक्ष होते.
.
एकीकडे सगळे लोक काहीतरी खरेदी करत होते, शॉपिंग करत होते, मधूनच येत होते, ऐकत होते, दाद देत होते… तर ही कविता नावाची गोष्ट किंवा साहित्य नावाची गोष्ट ही आपल्या अशा सगळ्या जगण्यामध्ये आत आत जाऊन खोलवर भिडली पाहिजे. त्यावेळेस मी तिला ऐकलं, तिची कविता तेव्हाही अतिशय लक्षात राहण्याजोगी होती. आणि आता जेव्हा तिने हा सगळा संग्रह पाठवला आणि ते सगळं स्क्रिप्ट वाचताना मला असं वाटलं की कविता लिहिणं आणि कवितेसदृश लिहिणं, यात फरक आहे. कविता लिहिणं आणि कवितेसारखं काहीतरी लिहिणं याच्यामधला जो भेद आहे, याच्यामधला जो फरक आहे, तो फरक यामिनीला अतिशय आतून कळलेला आहे असं मला वाटतं.
.
या कवितांमध्ये प्रेमाची सुद्धा जी कैक रूपं आहेत, त्यामध्ये सुद्धा पुरुषाची एक जी टिपिकल अशी जी प्रतिमा असते त्याला छेद देणाऱ्या सुद्धा कविता आहेत, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. शेवटचा जो सगळा भाग आहे तो वाचत असताना मला अगदी विद्रोही कवितांची, आमच्या स्त्रीवादी म्हणवल्या जाणाऱ्या कवितांचा पायरव हा तिच्या या सगळ्या कवितेमध्ये ऐकू आला. आणि बरोबर आहे आपण पूर्वसुरी म्हणून कोणाला निवडतो, आपण पूर्वसुरी म्हणून कोणाची निवड करतो हा सुद्धा भाग फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं.
.
आपल्याकडे सतत एक असं असतं की संवेदनशीलता, कल्पना, भावना किंवा भावप्रधानता हाच काहीतरी कवितेचा स्थायीभाव आहे. जणू काही कवितेचं आणि वैचारिकतेचं काही एकमेकांशी नातं नाहीये. परंतु आज आपण मराठी साहित्याचा जो अगदी १२ व्या, १३ व्या शतकापासूनचा जर प्रवास आपण बघत राहिलो, तर चांगली कविता, श्रेष्ठतेच्या पातळीवर जाणारी कविता किंवा जागतिक वाङ्मयाच्या परिदृश्यावर नाममुद्रा ज्या कवितेने उमटवलेली आहे, ती कविता ही संवेदना, भावना आणि वैचारिकता याचं एकमेकांशी जे अभिन्नत्व आहे, ते अभिन्नत्व घेऊनच पुढे गेलेली आहे.
.
मला नेहमी असं एक वाटतं की प्रज्ञा दया पवारला पुसून टाकणारी, नीरजाला पुसून टाकणारी, कविता महाजनला पुसून टाकणारी एक अतिशय ताकदीची कविता यायला पाहिजे. आणि हे सगळं घेऊन आपण किती काळ ते केशवसुत, मर्ढेकर, दया पवार, नामदेव ढसाळ. हिच नावे घेत राहणार आहोत.. ती दिग्गज नावं आहेत, पण या पलीकडे मराठी वाङ्मयाचा , कवितेचा प्रवास प्रवास हा जायला पाहिजे.
.
त्या सगळ्या प्रवासामध्ये आज यामिनी ही अतिशय दिमाखाने, अतिशय अपेक्षेने हा ‘काजळकाठ’ घेऊन आपल्या समोर आलेली आहे. तिचं मनःपूर्वक स्वागत करून मी तिला शुभेच्छा देते.
.
डॉ. प्रज्ञा दया पवार
(२४ मे २०२६ रोजी रविन्द्र नाट्य मंदिर मिनी थियेटर मधे मांडलेल्या त्यांच्या शब्दांचे शक्य तसे केलेले टिपण)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत