फार गोड दिवस आहे. बघा किती छान आत्ताचा कार्यक्रम चालू आहे पहिल्या क्षणापासून. मला असं वाटतं एखाद्या गझल लिहिणाऱ्या व्यक्तीचं हे स्वप्न असू शकतं की आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भीमरावांनी आपल्या चार ओळी गाव्या. असे स्वप्न बघणारे गझलकार किती असतील महाराष्ट्रात! पण ते किती सहज झालं आणि त्यांचं गाणं ऐकणं किती आनंददायी आहे हे आपण सगळे जाणतो. आणि ते ज्या पद्धतीने ते शब्द गात होते… प्रत्येक गाणाऱ्या माणसाने असे शब्द गायला शिकायला पाहिजे असे शब्द गातात ते.
.
‘काजळकाठ’ नाव किती सुंदर आहे. मुळात अनेक गोष्टींसाठी मला या काव्यसंग्रहाचं कौतुक वाटतं. सगळ्यात पहिलं कौतुक याच्यासाठी की तिने तो स्वतःचा काव्यसंग्रह करण्याची घाई केली नाही, म्हणून तिचे विशेष कौतुक. काय होतं अलीकडे, थोड्याश्या कविता साचल्या किंवा साठल्या की पहिला विचार येतो, “म्हणजे २० झाल्यायत, अजून किती लिहायला लागतील?” हा विचारच असू शकत नाही. खूप (शंभर-शे) झाल्यायत, आता याच्यातल्या कुठल्या घेऊन संग्रह करूया, हा तिसरा असा विचार आहे.
.
आणि सगळ्यात मेन, तिने हे जे एम्फॅटिकली, कॉन्फिडेंटली सांगितलं ना की, ‘या सगळ्या मुक्तछंदातल्या कविता आहेत’, हे फार महत्त्वाचं आहे. ज्याला राग कळतो, तो राग मोडू शकतो. कसं, एखादा राग गाताना एक सूर इकडे तिकडे लावणं… अमीर खाँ साहेब लावायचे असं म्हणतात की भिन्न षड्ज गाताना एक नोट अशी वेगळी लावून दाखवायची की ते त्याच्यावरन कंपोझिशन सही झाली अनेक. तिला वृत्त चांगलं कळतं म्हणून ती मुक्तछंदात लिहू शकते. वृत्त जमत नाही म्हणून लिहिलेल्या मुक्तछंदातल्या कविता वेगळ्या.
.
हे फार महत्त्वाचं आहे. जे आत्ता फार चांगलं प्रज्ञाताई वाक्य बोलल्या की ‘कविता सदृश काहीतरी लिहिणं’, आणि ते अलीकडे खूप दिसतं, की कवितेसारखं काहीतरी. जी सादरीकरणातनं गद्य लिखाणच कवितेसारखं सादर केलं जातं, आणि मग ‘हे कविता म्हणूनच तुम्ही स्वीकारा’… आणि मग हळूहळू ती कविताच वाटायला लागते. आणि मग तो कवीच वाटायला लागतो. आणि वाटायला लागणं फार धोक्याचं.
.
काय होतं… म्हणजे मांजर चार वेळा ओरडलं आणि त्याला जर काही हजार लोक म्हणायला लागले की ‘याला डरकाळी म्हणा’, तर आपण शेवटी म्हणतो की ‘असेल बाबा, आपलं चुकलं असेल काहीतरी, ही डरकाळी असू शकते’. असं म्हणण्याच्या काळामध्ये हा आत्मविश्वास मला फार महत्त्वाचा वाटतो, कारण तिची वृत्तबद्ध कविता पण मी वाचलीये, गझल वाचलीये. हे सगळे फॉर्म तुम्हाला येत असल्यानंतर ते सगळे बाजूला ठेवणं आणि मग कविता सादर करणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि फार अवघडही आहे.
.
काजळकाठ नाव याच्यासाठी आवडलं की, काजळ सौंदर्य म्हणून तर वापरतातच, अनेक कवींनी अनेक वर्ष काजळ वेगवेगळ्या रेफरन्सनी वापरलं. आरती प्रभूंनी फार वेगळ्या रेफरन्सनी वापरलं की,
.
“ऊन मीठ पाणी काजळाच्या मागे, भिजे माझा पीळ त्याचे धागे धागे.”
.
तर दोघांचं एकरूप होण्याची कविता आहे आरती प्रभूंची की, “कधी माझी कधी त्याची सावली, रिंगाळे माझीच चोरट्या पावली”. इतके आम्ही एक झालोयत की आता सावली कोणाची पडेल सांगता येत नाही. याच्यात एक किती छान ओळ आहे पाहा की, ‘ऊन मीठ पाणी’ म्हणजे अश्रू, ‘काजळाच्या मागे’. तर हा काजळाचा काठ कुठला? ज्याच्या आत गोष्टी आहेत, आणि ज्याच्या बाहेर गोष्टी आहेत. ज्या आतल्या गोष्टी सगळ्या दाखवता येत नाहीत, त्या सजवता येतात कधी कधी. त्या आरती प्रभूंनी सजवल्या. अजून एका त्यांच्या कवितेतली ओळ आहे की, “नुसते नुसते नभ निळे सकाळ सरून, नुसता तरी पक्षी बसे झाडावरती शिरून”. हे सगळं जे आपण सगळ्यांनी लॉकडाऊनमध्ये केलं बघा की आकाश निळं दिसायचं पण सकाळ झालेली नसायची. नंतर ऊन असायचं पण दुपार झालेली नसायची. असा तो काळ होता. तर त्यांनी लिहिलं,
.
“नुसते निळे डोळे त्यात काजळ भरून, नको होते छपावया रात्र जागरण.”
.
तर त्रास जो आहे रात्रभराचा तो काजळ घालून लपवता येत नाही, डोळे सुंदर दिसतात पण त्रास लपत नाही. तर हा जो काठ आहे ना, हा तो त्रासाचा काठ आहे बघा, की ज्याच्या पलीकडे पडू अशी भीती आहे. आणि अलीकडे सगळा त्रास आहे. आणि म्हणून ते काठ आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात ना की ‘Why are you looking so edgy?’ त्या एज (edge) ला फार महत्त्व आहे. आणि एज असणं फार आवश्यक आहे बोलण्याला, गाण्याला, कवितेला. त्याला आपण ‘धार’ ही म्हणतो की धारच नसेल, तर परत ते कविता सदृश असतं.
.
अजून एक मला गोष्ट आवडली की स्त्री कवयित्री आहे, तरुण कवयित्री आहे, गाणी-बिणी होती, पण लाडं-लाडं नव्हतं ते. मला फार बरं वाटलं. सारखं असं ते गुलाबी गोड… बरोबर आहे की नाही? नको वाटतं की नाही सारखं? ‘मी तुझी झाले, तू माझा’ सारखं, हो ते ठीक आहे. पण आता पुढे काय बोलूया आपण त्याच्या पलीकडे पण. जावेद अख्तर साहेबांच्या तरकशमध्ये ओळी आहेत की,
.
“लो देख लो ये इश्क है, ये वस्ल है, ये हिज्र.”
(हे प्रेम बघितलं, मिलन बघितलं, जुदाई बघितली.)
“लो देख लो ये इश्क है, वस्ल है, ये हिज्र, अब लौट चले आओ बहुत काम पडा है.”
.
या कविता त्या कामाच्या कविता आहेत. ‘अब लौट चले आओ बहुत काम पडा है’. सांगण्याचं खूप राहिलंय अजून. खूप राहिलंय. तिची त्या कवितेतल्या ओळी होत्या ना… की काय असतं आपण कोरं बसल्यानंतर आणि पूर्ण बसल्यानंतर, दोन्ही फार महत्त्वाचं असतं प्रेक्षकांच्यात. प्रेक्षकांच्यात कोरं पण बसायला पाहिजे, आणि पूर्ण पण बसायला पाहिजे.
.
म्हणजे किती वाजता निघता येईल? अजून किती वेळ असेल? मी स्टेजवरनं पण अलीकडे बघतो ना… पूर्णच नसतात लोक. ऑडियन्समध्ये लोक पूर्णच नसतात. तंद्रीच लागत नाही अलीकडे. तंद्री लागणारे चेहरे फार रेअर (rare) होत चाललेत बघा. बेभान झालेले चेहरे सतत दिसतात. पण अंतर्मुख होऊन तंद्री लागलेली माणसं बघणं हा आजचा एक अजून एक अनुभव होता. माझ्या पाठी… सगळ्यांच्याकडे पाठ होती सगळ्यांची, पण तंद्री जाणवते पाठीला पण. आणि खरंच जाणवत होती.
.
काहीतरी तिला सांगायचंय. आणि पूर्ण आणि कोरं बसल्यानंतर कुठे काटा आला, ते आठवत राहतं नंतर. तो काटा घरी घेऊन जातो माणूस. काय होतं माणूस मला वाटतं की शिट्ट्या वाजतात ओके, वन्स मोअर ओके, हे सगळं ठीक आहे. घरी काय घेऊन जातो माणूस? तर तो काटा घेऊन जातो.
.
आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. म्हणून बेभान होणं… तुम्ही अलीकडे मी अभंगाच्या पण कार्यक्रमात बघितलं की ‘चला आता सगळ्यांनी उभा राहा आता खुर्च्यांवर उभा राहा’. तल्लीन होण्याचा प्रकार आहे ना अभंग? बेभान होण्याचा नाहीये. आणि व्हावंसं जरूर व्हावं. दिवसभरात बेभान महफिलीत जरूर व्हावं. पण आपण सकाळी उठल्या उठल्या बेभान नाही होत ना. आपण अंतर्मुख होतो. आपल्याला कुठेतरी शांत काहीतरी ऐकावंसं वाटतं. आणि रात्री झोपताना आपण डोळे मिटून जे काही क्षणभर म्हणतो की ‘चला देवा बरं गेलं, आजचा दिवस चांगला गेला.
.
तर त्या बेभान होण्यापलीकडे खूप काय काय होतं आणि तो काटा कुठे आला… अनेक ठिकाणी आला. पण ते जे ‘आईचा श्वास बघणं’ होतं ना… तिथे आला. कारण एका वयानंतर… मला माहितीये माझी आई ऐंशी वर्षाची आहे. आमच्याकडे अजूनही सगळ्यात एनर्जेटिक तीच आहे, म्हणजे दार वाजवल्यानंतर पटकन दार कोण उघडतं? तर आई झोपते. पण… जर कधी मध्यरात्री जाग आली पाणी पिताना प्यायला, तर पाणी पिल्यानंतर सहज डोकावलं जातं आईच्या रूममध्ये आणि बघितलं जातं की छान श्वास चालूये.
.
ही जी प्रत्येक मुलाची जी कुठेतरी… आणि हे आपण बोलत नाही बरं का, कारण हे बोलायची पण भीती वाटते मुलांना. ती बोलली. ही सगळ्यांच्या मनातली भीती पण बोलून दाखवायला खूप धाडस लागतं. भीती सगळ्यांच्या मनात असते पण ती बोलून दाखवणारी एखादी व्यक्ती असते. ही सगळ्यांची भीती आहे.
.
मगाशी विनोद ने उल्लेख केला ते माझं आवडतं गाणं आहे आणि सुनिधी चौहाननी गायलेलं माझं गाणं आहे ते. आणि ती ओळ मला ना इतकी अस्वस्थ करते आजही की,
.
“तुम कहते हो कविता लिख दो, मुझे खून बहाना पडता है…
शब्दों की खींचातानी में नब्जों का धागा कटता है,
गम की नुकीली नश्तर से दिल पर गुदवाना पडता है,
बंजर कागज के सीने में खंजर बन जाना पडता है.
वो गली जहां वो रहता था उस गली में जाना पडता है,
उसकी हर बात बयां करके फिर नाम मिटाना पडता है…
मुझे खून बहाना पडता है.”
.
तर ही मी ना अशी व्हाट्सअपवर ऑडिओ आपण पाठवतो ना तसं गाऊन सुनिधीला पाठवली. आणि मी बघत होतो की तिने ती वाचली की पहिल्या एक मिनिटात जर फोन आला तर हे गाणं होणार. आणि तो अंदाज माझा खोटा ठरला नाही, तिने… “सलील जी ये किसकी, किसकी रचना है, मुझे गाना है, कब… कब कर रहे ये रेकॉर्ड?”
याला म्हणतात कविता आवडणारी व्यक्ती!
.
तर तुला ही शुभेच्छा देतो की ती अस्वस्थता अशीच राहू दे. फार स्वस्थ झालीस तर परत गोड गुलाबी… ‘मी तुझी झाले, तू माझा झाला’ वगैरे हेच. आणि हे पण लिही, त्या त्या वेळेला ते ते लिहिणार तू, मला माहितीये. पण त्याच्या पलीकडे हे जे हाताला सापडतंय ना, हे सोडू नकोस.
.
कारण आज… म्हणजे आज मी इकडनं आत्ता पुण्याला घरी गेल्यानंतर झोपताना माझ्याबरोबर ओळ असेल, ‘ती चर्चगेट ते विरार लोंबकळत राहतात कर्जाचे हात’. ती ओळ माझ्याबरोबर आज असेल, आणि ती ओळ मी विसरूच शकत नाही. अशी ओळ होती. प्रत्येक माणूस वेगवेगळं बघतो. काही लोकांना गर्दीच दिसते, काही लोकांना मेंढरं दिसतात, तुला कर्जाचे हात दिसले, लोंबकळणारे कर्जाचे हात.
.
आता ही संवेदनशीलता विकत मिळत नाही. ती सोशल मीडियावर पैसे देऊन वाढवता येत नाही. त्याचे फॉलोअर्सही होत नाहीत. ही संवेदनशीलता देव देतो आणि ती दुधारी असते, ती आपल्यालाही त्रास देते आणि समोरच्यालाही.
.
आणि अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे की ग्रंथाली… पहिलं पुस्तक… तू वाट बघितलीस. वाट बघितली की चांगली व्यक्ती मिळते, तुला चांगले प्रकाशक मिळाले. नाही, वाट बघणं फार आवश्यक होतं. मी कारण अनेक वर्ष तिची कविता वाचतोय, सोशल मीडियावर वाचतोय, तिथे कुठे कुठे कार्यक्रम असतात ते बघतोय. सगळं बारीक निरीक्षण सगळ्यांचं चालू असतं. आणि फार बरं वाटलं की तू थांबलीस. त्यामुळे तो इतका देखणा काव्यसंग्रह झाला, इतका खोल काव्यसंग्रह झाला, भीमराव गायले… हे योग असतात. मोठे योग असतात आणि मोठे योग यायला थांबावं लागतं.
.
तर आज शब्दनिष्ठांची मांदियाळी, कवितानिष्ठांची मांदियाळी समोर दिसतेय ना, ते फार सुंदर आहे. अशी माणसं एकत्र बसणं हे आपल्या सगळ्यांचं आयुष्य वाढवणारं असतं की नाही मला माहिती नाही, पण आनंद आणि आपली सेन्सिटिव्हिटी (sensitivity) वाढवणारं नक्की असतं.
.
फार वर्षांनी मी कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला आलोय, खरं सांगतो. ज्या पद्धतीने कवितासंग्रह निघत असतात, आणि ज्या प्रकाराचे निघत असतात… एक संगीतकार म्हणून ते लिटरली… म्हणजे आपण जसं कविता आनंदाने एकेक एकांतात भोगतो, तशी ती उलटी प्रकारेही भोगावी लागते. भीमरावांना पण याचा नक्की अनुभव असेल की, ‘माझं गाणं करा, माझं गाणं म्हणा…’ किती म्हणायचं की ‘अरे हो बाबा…’ पण त्यांना आपणून गावीशी वाटली, हे महत्त्वाचं आहे. आणि ते त्या ओळींना पण श्रेय आहे.
.
तर मी खूप मनापासून शुभेच्छा देतो यामिनी. फार उत्कृष्ट पद्धतीचा आजचा कार्यक्रम झाला. तर… शब्द तर आहेतच आणि हा जो काठ आहे ना, हे एज (edge) आहे, हे सांभाळून ठेव. त्या एजवर राहणं फार आवश्यक आहे. रोजच्या रोज ती अस्वस्थता असणं. आणि मग ते लिहिलं नाही, तरी चालतं. रोज लिहायलाच पाहिजे असंही काही नाही. आणि मला खात्री आहे की तू कायमच योग्य वेळेलाच लिहीशील आणि तू कधीच कविता सदृश लिहिणार नाहीस, तू कविताच लिहीशील. हे मला माहितीये.
.
आज फार चांगले कविता प्रेमी आहेत, रंगमंचावरही अनेक मान्यवर आहेत, मी तुम्हाला ही पण विनंती करतो की, जे नुसतेच ‘कविता सदृश’ आहे ना, त्याला कविता सदृश आहे हे पण म्हणा. ग्रंथालीचे सगळे मान्यवर आहेत, समोर अनेक मान्यवर आहेत, काय होतं, की म्हातारी मेल्याचं दुःख नाही… पण त्यामुळे काय होतं की ‘नाही नाही हे गद्य आहे, हे फक्त उभं उभं लिहिलंय म्हणून हे कविता नाही होणार’, हे पण सांगितलं पाहिजे. हा लेख आहे हवं तर, तुला हवंच असेल तर. पण कविता नक्की नाहीये, हे पण आपण सांगायला पाहिजे.
.
कारण काय होईल नाहीतर पुढची पिढी परत तेच… मांजराच्या ओरडण्याला कोणी डरकाळी म्हणलं तर आपल्या मुलांचं नुकसान होईल. आणि मला असं वाटतं की पुढच्या पिढीचे कलाकार पण कलाकारांनी तयार करावेत आणि रसिकांनी पुढच्या पिढीचे रसिकही तयार करावेत. ती जबाबदारी रसिकांची आहे. कारण फक्त पुढची पिढी चांगलं कविता करून चालणार नाही, ऐकणारे पण पाहिजेत तुमच्यासारखे, तर तुम्ही ती जबाबदारी नक्की घ्याल मला खात्री आहे.
.
~ डॉ. सलील कुळकर्णी
(२४ मे २०२६ रोजी रविन्द्र नाट्य मंदिर मिनी थियेटर मधे मांडलेल्या त्यांच्या शब्दांचे शक्य तसे केलेले टिपण)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत